Udayanraje Bhosale On Maratha Reservation: भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीका केली आहे. मी विष पिणार नाही, त्यांना विष पाजणार, असा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर आता उदयनराजे यांनी अत्यंत खोचक शब्दांत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, आज उदयनराजे भोसले साताऱ्यात बोलत होते. यावेळी उदयनराजे म्हणाले की, सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्वेदपत्रिका काढावी. सत्तेत बसणारे ज्या भावनेने निवडून आले. त्या भावनेला त्यांनी न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केल नाही. म्हणून स्वराज्याची स्थापना झाली. मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मराठा सामाजातील अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी टेन्समध्ये येत आहेत, असंही यावेळी भोसले म्हणाले. (वाचा - Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवा; महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज)
यापूर्वी दयनराजेंनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट केली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरू द्या. कोरोनाने भरपूर वेळ दिला आहे. हा वेळ अन्यायाविरुद्ध झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा आरक्षणाचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असे उदयनराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं होतं.
राज्यकर्त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही, तर तो कधीच सुटू शकत नाही. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या, असंही मत उदयनराजे यांनी व्यक्त केलं होतं.