फसवाफसवी करु नका, नाहीतर आपल्याला पण कळतं: उदयनराजे
खा. उदयनराजे भोसले ( Photo Credit: YouTube Video)

आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला? हा सध्या साताऱ्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चित विषय. त्यातच विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी आणि त्यांच्या विरोधकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची वेगवेगळी भेट घेतली. त्यामुळे या चर्चेला अधिकच उधान आले आहे. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवारांनी 'वेट अॅण्ड वॉच' भूमका घेतल्याने यावेळी घड्याळ कोणाच्या हातात हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. दरम्यान, उदयनराजेंनी 'फसवाफसवी करु नका, नाहीतर आपल्याला पण कळतं' असं आपल्या खास स्टाईलमध्ये स्टेटमेंट दिल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

शरद पवार-उदयन राजे पुणे भेट

प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, खा. उदयनरांजेंच्या विरोधकांनी शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. ही माहिती मिळताच उदयनरांजेंनीही शरद पवार यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. त्यानुसार शरद पवार-उदयन राजे यांच्या पुण्यात भेट झाली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी पवारांचे कौतुक केले. मात्र, आपल्या खास स्टाईलमध्ये स्टेटमेंट द्यायलाही ते विसरले नाहीत.

काय म्हणाले उदयनराजे?

'..आता पवारसाहेबांबद्दल काय बोलायचं. ते फार मोठे नेते आहेत. या वयातही केवढी धावपळ करतात. त्यांनी आपल्या सगळ्यांनाच लाजवलं. त्यांची भेट घेतली. मिठी मारली आणि सांगितलं, तुम्ही आमचेच आहेत. ठिकंय म्हटलं. पण, फसवाफसवी करु नका. नाहीतर आपल्याला पण कळतं'