Uber Cab Accident | Photo Credits: X)

Mumbai-Pune Expressway News: उबेर कॅब बुक करुन मुंबई-पुणे प्रवास करताना मुंबईस्थित पत्रकार आणि लेखक धवल कुलकर्णी आणि त्यांच्या कन्येला भीषण अपघाताचा (Uber Cab Accident) सामना करावा लागला आहे. धवल कुलकर्णी (Dhaval Kulkarni ) यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर घटनेचा तपशील आणि आलेला अनुभव कथन केला आहे. जो अतिशय धक्कादायक आणि रस्तासुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करतो आहे. धवल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रवासादरम्यान त्यांना आणि त्यांच्या 11 वर्षांच्या मुलीचा अपघात घडला. ज्यातून ते अत्यंत थोडक्यात बचावले. हा अपघात उबेर कॅब चालकाच्या चुकीमुळे घडल्याचा त्यांचा दावा आहे. कॅब चालवताना चालक वारंवार लेन बदलत होता. तसेच, अधुनमधून त्याला डुलकीही येत होती. त्यातच तो आपले वाहन अत्यंत बेदरकारपणे हाकत होता. त्यांनी वारंवार सूचना देऊनही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

धवल कुलकर्णी यांनी एका एक्स (पुर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये अत्यंत क्लेशकारक अनुभवाचे तपशीलवार वर्णन केले आहे. तसेच केंद्र आणि राज्य प्राधिकरणांना तसेच उबेरला घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा उपाय लागू करण्याची विनंती केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी आणि त्यांच्या मुलीने रविवारी पुणे ते मुंबई प्रवासासाठी उबेर कॅबची निवड केली. कॅब बुक करताना अॅपवर चालकाची सुरुवातीची सभ्यता आणि उच्च अॅप रेटिंग दिली होती. असे असतानाही एक्स्प्रेसवेवर वाहन चालवताना चालक जांभई देणे आणि बेपर्वा वाहन चालवत असल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी एकदोन वेळा त्याला लेन क्रॉस करताना आणि डुलकी घेतानाही पाहिले. दरम्यान, त्यांनी चालकाला वाहन बाजूला घेऊन चेहऱ्यावर पाणी मारण्याची सूचना केली. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान, प्रवास सुरु असताना कॅब खोपोली जवळआली आणि तिने एका ट्रकला धडक दिली. कारला एअरबॅग असल्याने त्या उघडल्या आणि संभाव्य धोका टळला. पण, कुलकर्णी आणि त्यांच्या मुलीला प्रचंड वेदना होत होत्या. ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. इतके सगळे होऊन जखमींची विचारपूस करुन त्यांना मदत करण्याऐवजी उबेर चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. मदतीसाठी उबेरकडे संपर्क केला. मात्र, उबेरनेही म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. इतकेच नव्हे तर बदली ओबर चालकाने कॉलही नाकारला. अखेर वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतरच त्यांना मदत मिळाली. मधल्या लेनमध्ये ट्रकने ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचे उबर चालकाने सांगितले.

एक्स पोस्ट

अपुऱ्या आपत्कालीन प्रतिसादाबद्दल कुलकर्णी यांनी महामार्ग पोलिस, आरटीओ अधिकारी आणि उबर यांच्यावर आरोप आणि टीका केली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांना या घटनेची दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.