मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik Highway) अंजूर पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी कार मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईकडून येणाऱ्या आर्टिका कार चालकाने माणकोली ब्रिजलगतच्या अंजूर पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी अचानक वळण घेतल्याने भरधाव दुचाकी कारवर आदळून भीषण अपघात झाला आहे. मरण पावलेले दोघेही कंत्राटी कामगार होते, अशी माहिती समोर आली आहे.

पंढरीनाथ वामन चौधरी (36), मिलिंद बाबू खंदारे (24) अशी अपघातातील मृतांची नाव आहे. पंढरीनाथ चौधरी आणि मिलिंद खंदारे यांच्यासह सदिप दशरथ धोत्रे (29) हे तिघेजण कामगार ठाणे महापालिकेत स्वच्छता विभागात कंत्राटी कामगार असल्याने ते रोजच्या प्रमाणे मुंब्रा येथे आपल्या कर्तव्यावर जात होते. दरम्यान, मुंबईहून औरंगाबादकडे आई व बहीण या दोघींना घेऊन जाण्यासाठी निघालेला कार चालक प्रशांत सूर्यकांत इंगळे (30) याने त्याची कार डिझेल भरण्यासाठी उजव्या बाजुकडील अंजूर पेट्रोल पंपावर अचानकपणे वळण घेतले. त्यामुळे पाठून भरघाव वेगात येणाऱ्या दुचाकी कारवर जाऊन धडकली. यात पंढरीनाथ आणि मिलिंद या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, संदिप हा गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. त्याच्यावर कल्याणच्या रुक्मिणी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हे देखील वाचा- बीड: विजेच्या खांबाला धडकून इंडिगो कार चा भीषण अपघात; चार जण ठार

मुबई- नाशिक महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या अनेक घटना घडत आहे. या अपघातात प्रवाशी नागरिकांना हकनाक प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे वाढते अपघात टाळण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या रोडवर उपाय योजना करून अपघात मुक्त महामार्ग निर्माण करावा, अन्यथा भाजप रास्ता रोको आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधेल, असा इशारा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दयानंद चोरघे यांनी दिला आहे.