Rape Stope | Representational Image (Photo Credits: File Image)

नागपूर (Nagpur) येथे दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगक छळाच्या (Sexually Abused) वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यातील एक घटना मुलीच्या मित्रानेच मैत्रीच्या नावाखाली केली आहे. तर दुसऱ्या घटनेत मुलीच्या आजोबानेच तिच्यासोबत दष्कृत्य केल्याचे पुढे येत आहे. दोन्ही घटनांमुळे अल्पवयीन मुलांच्या लैंगिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लैंगिक छळासारख्या घटना अनेकदा जवळच्या व्यक्तींकडूनच केल्या जातात. त्यामुळे बऱ्याचदा घटना घडूनही आरोपी अथवा दोषींपर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे आरोपींना पाठीशी न घालता अत्याचाराविरुद्ध बोलायला हवे असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते करतात.

लैंगिक छळाची पहिली घटना नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. यात मनीष लिंबाळे नामक तरुणाने परिसरातीलच एका 12 वर्षीय मुलीसोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चॅटींग सुरु केले. चॅटींगमधला संवाद पुढे मैत्रीत वाढला. त्यानंतर चॅटींगच्याच माध्यमातून त्याने तिला आपल्या घरी बोलावले. आरोपीने 24 एप्रिलच्या रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंर पीडितेला घरी बोलावले. त्यानंतर त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच घडला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. घडल्या प्रकारानंर पीडिता काही काळ गप्प राहिली. मात्र, अखेर तिने घडला प्रकार आईला सांगितला. त्यानंर आईने रविवारी (5 जून) जरीपटका पोलीसस्टेशन येथे जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा तसंच आयपीसीच्या कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी एका सरकारी कार्यालयात कंत्राटी कामगार आहे. (हेही वाचा, Digital Rape: अल्पवयीन मुलीसोबत 'डिजिटल रेप' केल्याप्रकरणी 80 वर्षीय वृद्धाला अटक; डिजिटल बलात्कार म्हणजे काय? जाणून घ्या)

दुसऱ्या घटनेत आरोपी हा पीडितेचे आजोबाच आहेत. ही घटना नागपूर येथील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. आजोबाने 13 वर्षीय पीडितेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, पीडितेची आई गर्भवती असल्याने ती माहेरी आली आहे. आई गर्भवती असल्याने ती आपल्या मुलीला आजोबांसोबत झोपायला पाठवत होती. एके दिवशी आजोबा आणि नात आक्षेपार्ग अवस्थेत आढळून आले. त्यामुळे आई संतापली. या घटनेवर घरातही चर्चा झाली. परंतू बदनामीच्या भीतीने विषय दडपण्यात आला. मात्र, पीडितेच्या आईने सोमवारी (6 जून) कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी आजोबांविरुद्ध पॉक्सो आणि आयपीसीच्या कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.