Pune Road Rage Case: पुण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. ट्रॅफिकमध्ये हॉर्न (Horn) वाजवल्याने संतापलेल्या दोन पुरुषांनी एका कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात एक महिला आणि तिच्या मुलीसह तीन जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास मुंढवा-कोरेगाव पार्क रोड (Mundhwa-Koregaon Park Road) येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार, राजेश वाघचौरे आपल्या कुटुंबासह गाडी चालवत असताना ते ट्रॅफिक जाममध्ये अडकले. वाघचौरेने समोरील गाडीला हॉर्न वाजवला. ज्यामुळे त्यांचा राजू गायकवाड आणि त्यांचा मुलगा शुभम गायकवाड यांच्याशी वाद झाला. गायकवाड कुटुंबाने त्यांच्या गाडीतून उतरून वाघचौरे यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. (हेही वाचा -Pune Road Rage: पिंपरी चिंचवडमध्ये ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला बोनेट वरून नेले फरफटत; 3 जण अटकेत)
हल्ल्यात कुटुंबातील तिन्ही सदस्य जखमी -
राजू गायकवाड आणि शुभम गायकवाड यांनी वाघचौरे यांची पत्नी सुवर्णा आणि मुलगी संस्कृती यांच्यावरही हल्ला केला. हल्ल्यात कुटुंबातील तिन्ही सदस्य जखमी झाले. गायकवाड यांनी वाघचौरे यांच्या गाडीचीही तोडफोड केली. या घटनेमुळे वाहतूकीत व्यत्यय आला. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून घटनास्थळावरील वाहतूक कोंडी कमी केली. (हेही वाचा - Pune Road Rage: पुणे येथील रोड रेज प्रकरणी एकास अटक; महिलेला केली होती बेदम मारहाण
पिंपरी चिंचवडमध्ये रोड रेंज प्रकरण -
दरम्यान, गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, कार चालकाशी झालेल्या वादानंतर एका दुचाकीस्वाराला ऑडी कारच्या बोनेटवरून सुमारे 2 किलोमीटर ओढण्यात आले होते. ही घटना 1 डिसेंबर 2024 रोजी घडली होती. या घटनेमुळे रस्ता सुरक्षितता आणि चालकांमध्ये आक्रमक वर्तनाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुणे पोलिस निरीक्षक अशोक शिर्के यांनी सांगितले की, दुचाकीस्वार आणि ऑडी चालक यांच्यात मतभेद झाल्याने हा वाद सुरू झाला. बेपर्वा चालकाने कारचा वेग वाढवून गाडीच्या पुढच्या भागावर दुचाकीस्वराला रस्त्यावर ओढले.