Mahad Building Collapse: मंत्री एकनाथ शिंदे घेणार महाड दुर्घटनेमध्ये संपूर्ण कुटुंब गमावलेल्या दोन मुलांचे पालकत्व; 10 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवणार
एकनाथ शिंदे (Photo Credit: Facebook)

24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड (Mahad) परिसरात 5 मजली इमारत कोसळली (Building Collapse) होती. तब्बल 40 तासांच्या नंतर याचे बचाव कार्य पूर्ण झाले आहे. आता या दुर्घटनेमध्ये आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार व पाच वर्षांच्या दोन लहान मुलांचे पालकत्व नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी स्वीकारले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन या मुलांचा स्वीकार करणार आहे आणि त्यांच्या आर्थिक खर्चाचा भार आम्ही घेऊ, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहान मुलांची नावे आहेत. या मुलांच्या खात्यावर प्रत्येकी 10 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तब्बल 18 तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले होते. दुसरीकडे अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे तो या अपघातामधून बचावला. मात्र या दुर्घटनेमध्ये त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. आता एकनाथ शिंदे या मुलांचे पालाकात्ब स्वीकारणार आहेत व शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन उचलणार आहे.

एएनआय ट्वीट -

महाडमध्ये सोमवारी तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत कोसळली होती. दुर्घटनेतील मदत व बचावकार्य 40 तासांनी पूर्ण झाले आहे. या अपघातामध्ये एकूण 14 जणांचा मृत्यू झाला, तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे या प्रकरणी जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (हेही वाचा: Mahad Building Collapse: इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई करण्यात येईल - एकनाथ शिंदे)

दरम्यान, महाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत 14 जण मृत्युमुखी पडले असून, मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती सहायता निधीतून (एसडीआरएफ) प्रत्येकी 4 लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख असे 5 लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.