मकर संक्रात (Makar Sankranti) निमित्त पतंगबाजीच्या खेळात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एक मुलगा नाशिक येथील असून दुसरा अहमदनगर येथे राहणारा आहे. पतंगबाजी करताना या दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अहमदनगर (Ahmadnagar) येथे राहणारा मुलगा शनीमंदिर येथील एका घरावर पतंग उडवित होता. त्यावेळी त्याला विजेचा धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुषार वाडीले असे या मृत मुलाचे नाव आहे. तुषार हा मित्रांसोबत एका घरावर पतंगबाजी करत होता. त्यावेळी जवळच असलेल्या विजेच्या तारेवर पतंग अडकल्याने तुषारने ती पतंग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तुषारला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. तर तुषारचे दोन मित्रही यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत.
तर नाशिक (Nashik) येथे इमारतीवर पतंग उडवत असताना खाली तोल जाऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुफियान कुरेशी असे या मृत मुलाचे नाव आहे. सुफियान हा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पतंग उडवित होता. त्यावेळी इमारतीवरुन खाली तोल जाऊन तो पडला. यामुळे सुफियानच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे पतंग उडविणाऱ्या मुलांकडे वेळोवळी लक्ष द्या असे सांगितले जाते.