शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. रोज एखादी पत्रकार परिषद घेत, सोबत सोशल मिडीयावरून ते भाजप पक्ष किंवा नेत्यांवर टीका करत आहेत. गेल्या 15 दिवसांतील मानसिक आणि शारीरिक तणावामुळे काही दिवसांपासून त्यांना छातीत वेदना होत होत्या. आज अचानक त्यांना रुग्णालयात (Sanjay Raut Hospitalised) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळून आले आहेत. त्यामुळे तातडीने निर्णय घेत त्यांची अँजिओप्लास्टी सुरु झाली आहे.
लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु आहे. मागील काही दिवस चालू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांना विश्रांती मिळत नव्हती. यामुळे तब्येतीवर येणार ताण वाढत गेला. आज अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले व त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी सुरू आहे. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर डॉ. जलील पारकर यांची टीम उपचार करत आहेत. (हेही वाचा: संजय राऊत हॉस्पिटलमध्ये दाखल; छातीत वेदना होत असल्याने पुढचे दोन दिवस कोणालाही भेटणार नाहीत)
रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यातून त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. संजय राऊत यांच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या सत्तास्थापनेच्या (Maharashtra Government Formation) दृष्टीने पाऊले उचलत आहेत. सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या मुदतीमध्ये शिवसेना आपले बहुमत सिद्ध करू न शकल्याने आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला ही संधी दिली गेली आहे.