Turbhe MIDC BMW Workshop Fire: नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी येथे भीषण आग,  40 ते 45 BMW  कार जळून खाक
BMW. (Photo Credits: BMW India)

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील तुर्भे एमआयडीसी (Turbhe MIDC) परिसरात एका गोडाऊन कम शोरुमला भीषण आग लागली. या आगीत जवळबास 40 ते 45 बीएमडब्ल्यू (BMW ) कार जळून खाक झाल्याची माहिती आहे. ही आग तुर्भे एमआयडीसी परिसरातील भूखंड क्रमांक डी- 207 येथे लागली. बीएमडडब्ल्यू कार आलीशान आणि तितक्याच महागड्या असतात. त्यामुळे झालेले नुकसानही मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी आगीच्या घटनेची नोंद घेतली आहे. अग्निशमन दलाचा अहवाल आल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे तुर्भे पोलिसांनी म्हटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, घटनेची माहिती कळताच एमआयडीसीसह कोपरखैरणे, नेरूळ व शिरवणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्या आणली. या आगीत 40 ते 45 बीएमडब्ल्यू कारसह गोडाऊनमधील इतर फर्निचरही मोठ्या प्रमाणावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. शिवाय कागदपत्रेही जळून खाक झाल्याचे समजते. (हेही वाचा, BMW Car Catches Fire: बीएमडब्ल्यू कार दगडाला धडकली अन जागेवरच पेटली, ट्रायल महागात पडली; कोल्हापूर येथील घटना)

तुर्भे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली  आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमन दल या घटनेचा तपास करत आहे. अग्निशमन दलाच्या अहवालानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे तुर्भे पोलिसांनी सांगितले आहे.