शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा मंदिरात (Shirdi Sai Baba Temple) भाविकांसाठी लावलेल्या ड्रेसकोड सक्तीच्या फलकावर आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी आक्रमक भूमिका देत हा बोर्ड हटविणार असल्याचे सांगितले आहे. त्यासंदर्भात त्या आज शिर्डीत जाणार असून हा बोर्ड हटविणार आहे असे त्यांनी आधीच सांगितले होते. मात्र शिर्डी संस्थानांनी देखील त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून त्यांना शिर्डीत येऊ देणार असे सांगितले आहे. त्यामुळे आज शिर्डीत चोख पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. लवकरच त्या शिर्डी साईबाबा मंदिरात दाखल होण्याची शक्यता आहे.
"शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारणार" असा इशारा तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.हेदेखील वाचा- Shirdi: तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेश करण्यास बंदी; छोट्या कपड्यांबाबतचा वाद शिगेला
नेमकं काय होते हे प्रकरण:
अनलॉकच्या टप्प्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरु झाली. त्याचबरोबर शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा मंदिर देखील सुरु झाले. मात्र काही दिवसांपूर्वी या मंदिराबाहेर एक फलक लावण्यात आले. या फलकावर 'मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा' असं आवाहन संस्थानकडून करण्यात आले होते. याला विरोध करत तृप्ती देसाईंनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत देसाई याआधी म्हणाल्या होत्या की, ‘मंदिर प्रशासनाने दिलेल्या नोटिसमध्ये लहान कपड्यांविषयी स्पष्टीकरण दिले गेले नाही, कारण जर असे असेल तर मंदिराचे पुजारी अर्ध-नग्न वस्त्रही परिधान करतात. अशा परिस्थितीत हा नियम त्यांनाही लागू होते. मी मंदिर प्रशासनाला आव्हान देते की जर दहा डिसेंबरपर्यंत मंडळाकडून नोटीस काढली गेली नाही तर मी स्वतः जाऊन ती नोटीस काढून टाकेन.’