Trupti Desai Challenges Supriya Sule: बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा सुप्रिया सुळे नको; भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली निवडणूकीच्या रिंगणात त्यांना आव्हान देण्याची इच्छा
Supriya Sule Vs Trupti Desai | Facebook

आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी आता टप्प्या टप्प्याने सुरू झाली आहे. बारामती (Baramati) मध्ये आता लोकसभा निवडणूकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची इच्छा भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai)  यांनी देखील बोलून दाखवली आहे. पण यासोबतच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले आहे. सलग 3 टर्म खासदारकी सुप्रिया सुळेंनी अनुभवली आहे मग आता त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय? असा सवाल करत त्यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं आहे.

मतदारसंघाला नवा चेहरा लागतो. मागील 3 टर्म सुप्रिया सुळेच खासदार आहेत पण असे असूनही अनेक भागात अद्याप नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा मिळू शकत नाही. त्यामुळे आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला भागात राहतो. इथेही अनेक समस्या आहेत. या भागातून त्यांना कधीच लीड मिळत नाही असं म्हणत आपण आगामी निवडणूकीमध्ये लढण्याची इच्छूक आहोत असे त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान भाजपा, आप किंवा थेट एनसीपी नेही तिकीट दिल्यास आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबाची या मतदारसंघावर मक्तेदारी असू शकत नाही. या घराणेशाहीच्या विरोधात जाऊन आता लोकसभा निवडणूक जनतेच्या हातात येईल आणि त्यांना नाकारलं जाईल अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.

तृप्ती देसाई यांनी अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचाराविरूद्धच्या आंदोलनामध्ये काम केले होते. सोबतच त्यांनी शनिशिंगणापूरच्या चौथार्‍यावर महिलांनाही पूजेचा मान मिळावा म्हणून लढाई लढली होती. मराठी बिग बॉसमध्येही त्यांनी सहभाग घेत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'तृप्ती देसाई काय चीज आहे हे तुम्हांला निवडणूकीत समजेल'  असंही त्या म्हणाल्या आहेत.