Donald Trump | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची रिअल इस्टेट फर्म पुण्यात (Pune) एक व्यावसायिक टॉवर (Commercial Tower) बांधण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतामधील हे पहिले कार्यालय असेल. देशात ट्रम्प ब्रँड अंतर्गत निवासी फ्लॅट्स बऱ्याच काळापासून आहेत, परंतु येथे कोणतीही व्यावसायिक मालमत्ता नव्हती. आता पुण्यात अशी मालमत्ता उभारली जाणार आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशनने 10 वर्षांपूर्वी भारतातील लक्झरी गृहनिर्माण बाजारात प्रवेश केला होता. आता ते पुण्यात ट्रम्प वर्ल्ड सेंटर सुरू करून व्यावसायिक मालमत्ता बाजारातही प्रवेश करत आहेत.

ट्रम्प यांचे भारतातील भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्सचे कल्पेश मेहता यांनी बुधवारी याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, पुण्यातील विकासक कुंदन स्पेसेसच्या सहकार्याने ते पुण्यातील कोरेगाव पार्कजवळ दोन व्यावसायिक टॉवर बांधतील. या प्रकल्पातून कंपनीला $289 दशलक्ष पेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

'ट्रम्प वर्ल्ड सेंटर पुणे' 16 लाख चौरस फूट जागेत पसरलेले असेल. त्यात दोन काचेचे टॉवर असतील आणि 27 पेक्षा जास्त मजल्यांवर कार्यालये असतील. दुसऱ्या टॉवरमध्ये मोठी कार्यालये असतील, जी भाड्याने देता येतील. हे विविध प्रकारच्या व्यवसायांच्या गरजा पूर्ण करेल. मेहता म्हणाले की, ट्रम्प ब्रँडसाठी अमेरिकेबाहेर भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष एरिक ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक आलिशान गृह प्रकल्पांवर एकत्र काम केल्यानंतर, आम्हाला भारतात आमचा पहिला व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्याचा अभिमान आहे.’ (हेही वाचा: Pune Real Estate: पुण्यातील घरांची सरासरी किंमत 6,590 रुपये प्रति स्क्वेअर फूट; आतापर्यंतच्या उच्चांकावर, विक्री घटली- Reports)

कंपनीने पुढे म्हटले आहे की, या प्रकल्पात क्रेच, सलून, ऑडिटोरियम, जिम, क्रीडा सुविधा, स्पा, रेस्टॉरंट्स आणि किराणा दुकाने यासारख्या सुविधा देण्याची योजना आहे. डोनाल्ड ट्रम्प ऑगस्ट 2014 मध्ये मुंबईत आले होते. लोढा ग्रुपच्या सहकार्याने त्यांनी वरळी येथील 75 मजली आलिशान 'ट्रम्प टॉवर'चे उद्घाटन केले. हा एक आलिशान घर प्रकल्प होता जो खूप यशस्वी झाला. आता ट्रम्प कंपनी व्यावसायिक मालमत्तेतही आपले नशीब आजमावू इच्छिते.