Coronavirus | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 14,492 नवे कोरोनाचे रुग्ण (COVID-19) आढळले असून 326 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6,43,289 वर पोहोचली असून 21,359 रुग्णांची कोरोना विरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. सद्य घडीला राज्यात 1,62,491 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर गेल्या 24 तासांत 12,243 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 4,59,124 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी करणा-या रुग्णांच्या संख्येमुळे राज्याचा रिकव्हरी रेट 71.37% इतका झाला आहे तर मृत्यूदर 3.32% इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यात 34,14,809 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील 6,43,289 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सद्य घडीला राज्यात 11,76,261 रुग्ण होम क्वारंटाईन असून 37,639 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

हेदेखील वाचा- COVID19 Tests In Single Day: भारताने कोविड 19 च्या दैनंदिन चाचण्यांमध्ये आज नवीन उच्चांक; एकाचं दिवसात 9,18,470 चाचण्या

तर देशातील कोरोना बाधितांचा आकडा 28,36,926 वर पोहचला आहे. त्यापैकी 6,86,395 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 20,96,665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान देशातील मृतांचा आकडा 53,866 इतका झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health and Family Welfare) देण्यात आली आहे.

कोरोना चाचण्यात नियमितपणे वाढ झाल्याने बाधित रुग्णांच्या दरात कमालीची घट झाली आहे. मोठ्या संख्येने चाचण्या घेण्यात आल्यामुळे सुरुवातीला बाधित रुग्णांचा दर वाढेल. परंतु, अनेक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे की, त्वरित अलगीकरण, प्रभावी शोधकार्य आणि वेळेवर व्यवस्थापन यासारख्या इतर उपायांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईल.