भक्तांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझरचा वापर | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) महाराष्ट्रात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सध्या महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना व्हायरस बाधित रुग्ण आहेत. त्यात सातत्याने नव्या रुग्णांची भर पडत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 38 असून त्यापैकी 16 रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे पुणे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणेश मंदिरात (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) दर्शन घेण्यापूर्वी भक्तांना सॅनिटायझर देण्यात येत आहे. यापूर्वी मुंबईतील सिद्धिविनायक मंदीरात देखील भक्तांच्या सुरक्षेसाठी दर्शनापूर्वी सॅनिटायझर देण्याची सोय करण्यात आली होती.

कोरोनाचा धोका रोखण्यासाठी गर्दीची ठिकाणं टाळणं आणि स्वच्छता बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सिद्धिविनायक मंदीर आणि श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणेश मंदिर या दोन्ही ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळेच खबरदारी म्हणून सॅनिटायझरचा प्रयोग करण्यात येत आहे. (मुंबई: Coronavirus मुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रभादेवी च्या सिद्धीविनायक मंदिरात देण्यात येणार 'या' विशेष सुविधा, आदेश बांदेकरांनी दिली माहिती)

ANI Tweet:

कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी जेजुरी येथील खंडोबा यात्रा, कार्ल्यातील एकविरा देवीची यात्रा, पैठण येथील एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसंच तुळजाभवानी मंदीरही 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. महड, पाली येथील गणपती दर्शनही बंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालये, जिम, स्विमिंगपूल, मॉल्स, थिएटर्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.