मुंबई: Coronavirus मुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रभादेवी च्या सिद्धीविनायक मंदिरात देण्यात येणार 'या' विशेष सुविधा, आदेश बांदेकरांनी दिली माहिती
Siddhivinayak Temple (Photo Credits: Wikimedia Commons Facebook)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमिवर वर्दळीच्या ठिकाणी शक्य होईल तितकी खबरदारी घेण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यात मंदिरे, मॉल्स, बाजार या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मुंबईतील जगप्रसिद्ध मंदिर सिद्धीविनायक मध्येही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. प्रभादेवी मंदिराचे विश्वस्त आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी ANI ला याबाबत माहिती दिली आहे. यापुढे सिद्धिविनायक मंदिरात येणा-या प्रत्येक भाविकाला मंदिरात प्रवेश करताच सॅनिटायजर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंदिराच्या स्वच्छतेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.

कोरोना व्हायरस भयाण संकट जगभरासह आता मुंबईतही शिरकाव करण्याचा प्रयत्न करु पाहत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात विशेष सुविधा सुरु करण्यात आली आहे. सिद्धिविनायक मंदिरात रोज हजारो भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. अशा वेळी कोरोना व्हायरस चा धोका त्यांच्यावर उद्भवू नये यासाठी मंदिराचे विश्वस्त आदेश बांदेकर यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. यापुढे मंदिरात येणा-या प्रत्येक भाविकाला सॅनिटायजर देण्यात येणार आहे.

ANI चे ट्विट:

त्याचबरोबर मंदिरातील स्वच्छतेवर जास्तीत जास्त लक्ष देण्यात येणार आहे. मंदिरातील फरशी तसेच जिथे भाविकांच्या हातांचा संबंध येईल असे हँडल्स, दारांना सतत स्वच्छ करण्यात येणार आहे असेही आदेश बांदेकरांनी सांगितले.

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर जाणे टाळत आहे. कर्नाटकात अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. तर शिर्डीतील साई मंदिरात देखील भाविकांची गर्दी कमी झालेली पाहायला मिळत आहे.