टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने एक मोठा निर्णय घेत कर्मचार्यांना सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सरकारविरोधी विधाने करण्यापासून प्रतिबंधित केले होते. याबाबत एक नोटीसही जारी करण्यात आली होती. मात्र या नोटीशीनंतर मोठा गदारोळ माजला. या निर्णयाचा अनेकांनी विरोध केला. आता अखेर टीआयएफआरने ही नोटीस मागे घेतली आहे. संस्थेच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. सोमवारी ही नोटीस मागे घेण्यात आली, असे संस्थेचे प्रवक्ते अजय अभ्यंकर यांनी सांगितले.
टीआयएफआर ही अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत देशातील प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. संस्थेने आपल्या कर्मचार्यांना सोशल मीडियावर सरकारविरोधी विधाने असलेल्या पोस्ट्स करण्यावर रोख लावली होती. मात्र शनिवारी नोटीशीबाबत चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे सांगितले गेले. नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘संस्था किंवा सरकारवर सार्वजनिक टीका करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असेल.’
13 एप्रिल, 2022 रोजी, DAE ने जारी केलेल्या नोटीसच्या परिणामी, TIFR च्या निबंधकांनी सर्व TIFR कर्मचार्यांना नोटीस जारी केली होती ज्यामध्ये, (1) संस्थेच्या परिसराची छायाचित्रे किंवा व्हिडिओ पोस्ट करणे आणि (2) व्हॉट्सअॅप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सरकारविरोधी विधाने करणे प्रतिबंधित केले होते. तसेच कर्मचार्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील याबद्दल माहिती देण्याची विनंती केली होती. (हेही वाचा: अमरावती मध्ये अचलपूर मधील परिस्थिती नियंत्रणात, मात्र आज दुसऱ्या दिवशीही पुढील आदेशापर्यंत संचारबंदी कायम)
आताच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘सूचनेचा उद्देश हे स्पष्ट करणे होता की वरील दोन्ही पूर्व-अस्तित्वात असलेले नियम सोशल मीडिया तसेच टीव्ही किंवा प्रिंट मीडिया सारख्या इतर माध्यमांना देखील लागू होतात. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आणि कर्मचारी सदस्यांच्या भेटींवर कोणतेही नवीन निर्बंध लादण्यात आले नाहीत किंवा लादण्याचा हेतू नाही. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ही नोट जारी केली जात आहे.’