मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्दा उचलून धरल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्वात आधी बांगलादेशी लोकांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांची मुंबई, ठाण्यासह पुण्यात ही मोहिम सुरु झाली. यात त्यांनी अनेक बांग्लादेशी घुसखोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्यांचे मनसेचे पुण्यातील आंदोलन फसले आहे. पुण्यातील पकडलेल्या बांगलादेशी पैकी तिघे भारतीय निघाले आहेत. पुणे पोलिसांनी तिघांनाही सोडून दिलं आहे. झाल्या प्रकाराबद्दल तिघानांही नाहक मनस्ताप झाला. आपण भारतीय असल्याचे ओळखपत्र दाखविल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
पुण्याच्या धनकवडीतील बालाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांग्लादेशी घुसखोरांचा शोध सुरू केला होता. शनिवारी सकाळी मनसेचे तब्बल 50 कार्यकर्ते पुण्यातील बालाजीनगर परिसरात नागरिकांचे ओळखपत्र तपासत होते. त्यातील तीन संशयित बांगलादेशी घुसरखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पण ते आता भारतीय असल्याचं समोर आलं आहे.
हेदेखील वाचा- 'औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करा' मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
काही दिवसांपूर्वी मनसेने ठाणे, बोरिवली या भागातील बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहीम केली होती. यावेळी ठाण्यातील किंगकॉंगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यावेळी त्या कुटुंबाकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी गोष्टी मिळाल्या. मात्र त्यांच्याकडे बांगलादेशाचा पासपोर्टही आढळून आल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली होती.
या घटनेने या 3 भारतीयांच्या कुटूंबाना नाहक त्रास सहन करावा लागला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही कागदपत्रांची विचारणा केली असताना त्यातील काहींना बांगलादेशी नसून बिहारी असल्याचे सांगितले. त्यामुळे येथे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मात्र याबाबतची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात आली.