अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीनंतर साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांना फोनवरुन धमक्या
Father Francis Dibrito | (Photo Credits: File Photo)

93rd Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan, Osmanabad: फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis Dibrito) यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी झालेली निवड समाजातील काही घटकांना फारशी आवडली नाही. त्यामुळे ही निवड केल्याबद्दल साहित्य महामंडळ (Marathi Sahitya Mahamandal) पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. साहित्य महामंडळ अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Patil) यांनीही या वृत्ताला दुजोरा देताना साहित्य महामंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन आल्याचे म्हटले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे यंदा उस्मानाबद (Osmanabad) येथे पार पडत आहे. संमेलनाचे यंदा 93 वे वर्ष आहे.

दरम्यान, धमक्यांच्या फोनबाबत बोलताना कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले की, '93 व्या साहित्य संमेलन अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केल्याचे समाजातील काही मंडळींना आवडले नाही. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना फोनवरुन धमक्या दिल्या जात आहे. आतापर्यंत मलाही धमकी देणारे सुमारे 20 ते 25 फोन आले आहेत. ज्या फोन क्रमांकावरुन धमक्यांचे फोन आले ते सर्व क्रमांक अनोळखी होते. तसेच, या धमक्या देणारे सर्वाधिक फोन हे ठाणे, कल्याण, मुंबई येथून होते', असेही ठाले पाटील यांनी या वेळी सांगितले. आलेल्या फोनमध्ये, 'तुम्हाला पाहून घेऊ', 'तुमचा दुर्योधन करु', अशा आशयाची वक्तव्ये धमकीच्या फोनद्वारे केल्याचेही ठाले-पाटील यानी प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, कितीही धमक्या आल्या तरी साहित्य महामंडळाचा निर्णय अंतिम आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवर आम्ही ठाम आहोत, असे साहित्य महामंडळ अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी म्हटले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, उस्मानाबाद येथे पडणार जानेवारी 2020 मधील 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)

जानेवारी 2020 मध्ये 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उस्मानाबद येथे पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीरही करण्यात आला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकताच समाजातील काही घटकांनी त्यास विरोध करत साहित्य महामंडळ सदस्यांना फोनवरुन धमक्या देण्यास सुरुवात केली.

दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाचे जोरदार समर्थन केले. तसेच, अध्यक्ष म्हणून दिब्रिटो यांच्या नावाला पाठिंबाही दिला. बहुमताने आलेला पाठिंबा पाहून साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाची निवड उस्मानाबाद येथे पार पडणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून केली.