Mukesh Ambani | (File Image)

देशातील आणि जगातील प्रसिद्ध अब्जाधीशांपैकी एक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. एका अज्ञात कॉलरने लँडलाइन फोनवरून फोन करून धमकी दिली आहे. आज (बुधवार, 5 ऑक्टोबर) दसऱ्याच्या दिवशी दुपारी 12:57 वाजता अज्ञात व्यक्तीने अंबानी कुटुंबातील काही सदस्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. अंबानी कुटुंबाच्या ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या (Reliance Foundation Hospital) लँडलाइन क्रमांकावर हा फोन आला होता. एका अनोळखी व्यक्तीने एका अनोळखी नंबरवरून केलेल्या या फोनमध्ये कॉलरने अँटिलिया आणि हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलरने केवळ हॉस्पिटल उडवण्याची धमकी दिली नाही, तर अंबानी कुटुंबातील काही लोकांना टार्गेट केल्याचेही माहिती मिळत आहे. याची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच पोलिसांचे एक पथक रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचून चौकशी करत प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पोलिसांनी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

फोन करणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तूर्तास, मुंबई पोलिसांनी याबाबत एवढेच सांगितले आहे की, अंबानी कुटुंबीयांकडून चालवल्या जाणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाइन नंबरवर धमकीचा कॉल आला होता. कॉलरने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली आहे आणि अंबानी कुटुंबातील काही सदस्यांना टार्गेट केल्याचे बोलले आहे. पोलीस अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अंबानी हॉस्पिटलच्या लँडलाईन क्रमांकावर अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या. (हेही वाचा: काय आहे Jio ची वेलकम ऑफर? 'या' खास यूजर्संना मिळणार फायदा, 'असा' आहे कंपनीचा प्लान)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धमकीचा फोन आला होता. फोन करणार्‍याने लोणावळा येथून फोन करून काही दहशतवादी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आत्मघातकी स्फोटकांनी हल्ला करणार असल्याचे सांगितले होते. फोन करणारी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नंतर उघड झाले. ही व्यक्ती घाटकोपरहून त्यांच्या मूळ गावी सांगलीला जात होती. वाटेत लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीच्या जादा दराच्या मुद्द्यावरून हॉटेलमालकाशी वाद झाला. त्यानंतर त्याने मुख्यमंत्र्यांवर होणाऱ्या हल्ल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली.