Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2018 : अस्पृश्यांचे नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार 'भारतरत्न' डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 62 वा महापरिनिर्वाण दिन (Dr. Ambedkar Mahaparinirvan Din). या दिवशी संपूर्ण भारतात बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाते. मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठा जनसागर उसळतो. काल (बुधवार) पासूनच देशभरातून हजारो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल व्यायला सुरुवात झाली होती. रात्री बारा वाजता चैत्यभूमीत बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. तसेच दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी त्यांनी जोरदार लढा दिला.
या दिनानिमित्त चैत्यभूमी येथे जनसंपर्क विभागामार्फत ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. तसेच 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित माहिती पुस्तिका विनामूल्य वितरित करण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या अनुयायांसाठी शिवाजी पार्क व परिसरात चोख व्यवस्था तसेच सेवासुविधा पुरविण्यात आल्या आहेत. सात शाळांमध्ये तात्पुरता निवारा, शामियाना व व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था, तीन ठिकाणी रुग्णवाहिकेसहित आरोग्यसेवा, एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा. 22 फिरती शौचालये, 380 पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था. मोबाईल चार्जिंगकरिता शिवाजी पार्क येथे 300 पॉइंटची व्यवस्था, मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्यवस्था अशा या सुविधा आहेत. याचसोबत अनुयायांसाठी अनेक सामाजिक संस्थांनी भोजन व्यवस्था केली आहे.
बेस्टने सुद्धा जादा बस सेवांप्रमाणेच वीजपुरवठा, जनरेटर, प्रथमोपचार, वैद्यकीय मदत केंद्रे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातली वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेने आज लोकलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन जादा तिकीट खिडक्यांसह, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांचा ताफाही तैनात केला आहे.