Bombay HC On Firecrackers: मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबई (Mumbai) आणि आसपासच्या परिसरात फटाके (Firecrackers) फोडण्याची वेळ आणखी कमी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आता रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी होती. मुंबईतील हवेचा दर्जा खालावत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश -
मुंबई महानगरातील प्रदूषणाबाबत तीन सदस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. बीएमसीलाही या समितीला मदत करण्यास सांगितले आहे. एमएमआर (मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन) क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या क्षेत्रातील प्रदूषण आणि उचललेल्या पावलांचा दैनंदिन अहवाल सादर करावा लागेल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेली समिती संबंधित महापालिकांना सूचना देऊ शकते. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता)
महापालिकांच्या दैनंदिन अहवालांच्या आधारे ही समिती आपल्या प्रतिक्रियांसह साप्ताहिक अहवाल तयार करून न्यायालयात सादर करणार आहे. आमचा हा आदेश एमएमआर (मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन) च्या सर्व महानगरपालिका आणि नगर पंचायतींना लागू असेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रतिज्ञापत्रात बीएमसीने शहरातील AQI सुधारण्यासाठी महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मुंबईतील 95 संवेदनशील ठिकाणी बीएमसी युद्धपातळीवर काम करत आहे. या ठिकाणांवर बीएमसीचे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत.