
No Blackout In Pune: उद्या म्हणजेच 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल (Mock Drill) होणार आहे. देशव्यापी नागरी संरक्षण मॉक ड्रिल दरम्यान पुण्यात वीज खंडित होणार नाही (No Blackout In Pune), अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (District Collector Jitendra Dudi) यांनी सोमवारी दिली. शहर सज्जता उपक्रमांमध्ये सहभागी होणार असले तरी, पुण्याच्या ड्रिल प्लॅनमध्ये ब्लॅकआउट सरावांचा समावेश नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मॉक ड्रिल दरम्यान घाबरण्याचे कोणतेही कारण नाही -
याबाबत बोलताना जितेंद्र डुडी म्हणाले की, मॉक ड्रिल पूर्णपणे सावधगिरीने करण्यात येईल. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जनतेची तयारी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. ड्रिलबाबतचे सर्व निर्णय केंद्रीय पातळीवर समन्वयित आहेत. (हेही वाचा -Security Mock Drills On May 7: पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 7 मे रोजी देशात होणार सुरक्षा मॉक ड्रिल; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये होणार हा सराव)
दरम्यान, पुणे शहरात, दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल कौन्सिल हॉलमध्ये सुरू होईल, तर तळेगाव नगर परिषद आणि मुळशी पंचायत समितीसारख्या ग्रामीण ठिकाणी अशाच प्रकारचे सराव केले जातील. सायरन अलर्ट, निर्वासन पद्धती आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे जिल्हा प्रशासन, पीएमसी, पीसीएमसी आणि संरक्षण संस्थांसह विविध एजन्सींमधील समन्वय यासारख्या आपत्कालीन प्रोटोकॉलची चाचणी घेणे हे या सरावांचे उद्दिष्ट आहे.
सायरनचा वापर इशारा म्हणून केला जाईल -
जर युद्ध झाले तर आपण तयार राहिले पाहिजे. सायरनचा वापर इशारा म्हणून केला जाईल. ज्यांना तो ऐकू येईल त्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे. ज्यांना तो ऐकू येणार नाही त्यांना ड्रिलचा भाग म्हणून शोधून बाहेर काढले जाईल, असंही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितलं. तथापि, महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात देखील मदत करतील, ज्यामुळे हा सराव तयारी आणि जागरूकता दोन्हीसाठी एक उपक्रम बनेल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केलं.