एकनाथ खडसे यांची बदनामी करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार- अनिल महाजन
Anil Mahajan | (Photo Credits- File Photo)

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची बदनामी करणाऱ्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम खडसे समर्थक करतील असे वक्तव्य ओबीसी समाजातील नेते अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी केले आहे. पाठीमागील दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विरोधकांकडून एकनाथ खडसे यांची मालमत्ता जप्त झाली नोटीस आली, ईडी पथक आले, अशी सोशल मीडियावर बदनामी सुरू आहे. पण असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले आहे. जे लोक सोशल मीडियावर बदनामी करत आहे .यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी व यांचा करेट कार्यक्रम लावण्याची तयारी खडसे समर्थकांनी जिल्ह्यात केली आहे, असेही महाजन म्हणाले.

राज्यात अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या यांना दिसत नाही पावसाने कहर केला आहे. अतिवृष्टी सुरू आहे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महापूर आल्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. संसार उघड्यावर आला आहे. परंतू, त्याकडे लक्ष देण्यास खडसे विरोधकांना वेळ नाही. त्यावर बोलायला कोणी तयार नाही. त्याउलट एकनाथ खडसे यांची नाहक बदनामी करुन अघोरी आनंद घेण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. त्यामुळे खडसे समर्थकांकडून गावोगावी नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल महाजन यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे अशा किती चौकशा झाल्या तरी काही फरक पडणार नाही. एकनाथ खडसे हे एक हुकमी एक्का आहेत. त्यामुळे ते लवकरच राज्यमंत्रिमंडळात दिसतील, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे.