अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील भगवानबाबा गडावर चोरी; चोरट्यांनी पळवली रायफल आणि तलवार
Bhagwangad (Photo Credits: Youtube)

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील भगवानबाबा गडावर चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरीत चोरट्यांनी भगवानबाबांच्या रायफल आणि तलवार पळविली आहे. मराठवाड्याचे शक्तीपीठ समजल्या जाणा-या भगवान बाबांच्या वस्तूंचीच चोरी होणे हा प्रकार खूपच धक्कादायक असल्याचे येथील गावक-यांचे म्हणणे आहे. या भगवाना बाबांशी येथील लोकांसोबत राजकारणी व्यक्तींची देखील श्रद्धा आहे. येथे येणा-या भक्तांना बाबांच्या वापरातील वस्तूंचे दर्शन घेता यावे, यासाठी भगवानबाबा गडावर संग्रह ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भगवान गडावरील शो-केसमध्ये ठेवण्यात आलेल्या भगवान बाबांची तलवार आणि बंदुकीचा सांगाडा चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे भगवानबाबांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाहन चोरी झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीला उशिराने माहिती दिल्यास क्लेमचे पैसे द्यावेच लागणार: सुप्रीम कोर्ट

गडावरील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केल्यानंतर काही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यावरुन, मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी रायफल घेऊन गेल्याचे दिसत आहे. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाही अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आधुनिक पर्वातील थोर संत भगवानबाबांच्या वास्तव्याने पावन झालेला भगवानगड दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा ऊर्जास्रोत म्हणून प्रसिद्ध आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे भगवानबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक वेळा गडावर जातात.