काय सांगता! 'कोरोनामुक्त' असलेल्या गावाला मिळणार मालामाल होण्याची संधी, जाणून घ्या स्पर्धेची पूर्ण माहिती
Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाने हैदोस घातला असून दुसरी लाट ग्रामीण भागात झपाट्याने पसरली. तरीही आपल्या गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये याची काळजी घेत ग्रामपंचायतींनी विशेष काळजी घेतली आहे. यात गावाच्या हद्दीत येणा-यांची कोरोना चाचणी, क्वारंटाईन यांसारखे अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. दरम्यान आता कोरोनामुक्त असलेल्या गावाला मालामाल होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी खास 'कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे' (Corona Free Village Competition) आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेची घोषणा केली. यात कोरोनामुक्त गावाला लखपती होण्याची संधी मिळणार आहे.

कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या निमित्ताने गावं वेगानं कोरोनामुक्त व्हावी हा प्रामाणिक उद्देश आहे. काही गावांमध्ये यासाठी प्रयत्न केले गेल्याचे आणि ते यशस्वी झाल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.हेदेखील वाचा- Covid-19 मध्ये मृत्युमुखी पडलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी, कुटुंबियांना 5 लाखाची आर्थिक मदत; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये याप्रमाणे तीन बक्षीस घोषित करण्यात आली आहेत. 6 महसुली विभागात प्रत्येकी 3 याप्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार आहेत. यासाठी बक्षिसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये ठेवलेली आहे.

करोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष 2515 व तीस-चोहोपन 3054 या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व 15 लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी गावांचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णयही जाहीर करण्यात येणार आहे.