Corona Situation in Maharashtra: केंद्राप्रमाणे राज्याने देखील व्यवस्था उभी करावी, वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | (File Photo)

संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैली सुरुच आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध अशी व्यवस्था उभी केली आहे, तशीच राज्याने देखील करायला हवी. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही, आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल." असं यावेळी फडणवीस म्हणाले .

"देशात सर्वात जास्त ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला झाला आहे. परंतु त्यांचे योग्यप्रकारे वितरण हे राज्य सरकारने करायला हवं. मला असं वाटतं की बलशाली नेते तिथे ऑक्सिजन व रेमडेसिविर अशाप्रकारची अवस्था येऊ नये. सगळ्यांना समान प्रमाणात ते मिळायला हवं. त्यापेक्षाही जिथं मोठ्याप्रमाणावर रूग्ण आहे, तिथं ते मिळालं पाहिजे. नाशिकचा जर आपण विचार केला इथला पॉझिटिव्हिटी रेट हा ३० टक्क्यांवर चालला आहे. अशा परिस्थितीत इथं ऑक्सिजन किंवा रेमडेसिविरची आवश्यकता जास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही अवस्था लक्षात घेऊन ही व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे." असंही यावेळी फडणवीस म्हणाले.हेदेखील वाचा- Sachin Sawant On Modi Government: लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी; सचिन सावंत यांची मोदी सरकारवर जोरदार टीका

"माझ्यापरीने होईल ते मी राज्यासाठी करतच असतो, केंद्र सरकारने रेमडेसिविरचा सर्वाधिक साठा हा राज्याला दिला. ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा महाराष्ट्राला दिला. जवळ जवळ पहिल्याच खेपेत 1100 व्हेंटिलेटर हे महाराष्ट्राला दिले. आता पीएसए प्लॅन्ट देखील मोठ्याप्रमाणात महाराष्ट्राला दिले. त्यामुळे मला असं वाटतं की राज्य व केंद्रामध्ये कुठेही समन्वयाचा अभाव अशा प्रकारची अवस्था नाही. केंद्र सरकारने अतिशय तर्कशुद्ध व्यवस्था उभी केली आहे. तीच राज्याने देखील केली पाहिजे. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही." असंही ते यावेळी म्हणाले.

आपल्या सर्वांना एकत्रित काम करावं लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी वारंवार सांगितलं आहे की आज एकत्रितपणे जनतेच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं. म्हणून माझंही मत स्पष्ट आहे कोणी कुणाकडे बोट दाखवणं योग्य नाही, आपल्याकडे उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आपण करायला हवा.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.