उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

शिवछत्रपती यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त 350 गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त, ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. यावेळी  ते बोलत होते.

कौशल्य विकास विभागांतर्गत राज्यातील 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) यांच्याद्वारे परिसर स्वच्छता आणि गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दीड लाख विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या भौतिक प्रगतीसाठी स्वच्छ व स्वस्थ भारत असणे गरजेचे आहे. राज्याचे खरे वैभव हे गड किल्ले आणि जलदुर्ग आहेत. त्यांचे संवर्धन व स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन करीत आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, राज्याचे वैभव जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. (हेही वाचा: State Ministers Foreign Tours: राज्यातील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर Aaditya Thackeray यांचा निशाणा; मंत्री Uday Samant यांच्या लंडन-म्युनिक-दावोस भेटीबाबत उपस्थित केले 'हे' प्रश्न)

घरोघरी शौचालय उभारणे, हागणदारीमुक्त भारत या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मल-जल शुद्धीकरण सुरु असून, राज्यात 221 सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. प्रधानमंत्री यांच्या संदेशानुसार 17 सप्टेंबरपासून सुरू असलेला स्वच्छता पंधरवडा पुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.