Dagdusheth Ganpati (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गुढीपाडव्यानिमित्त पुण्यात स्वारगेट येथे सुरु होणारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट (Shrimant Dagdusheth Ganesh Temple) चा संगीत महोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे.दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा मंदिराचा 38 वा वर्धापन दिन आहे. मात्र राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला दरवर्षी संगीत महोत्सवाला प्रारंभ होतो. गेली अनेक वर्षे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोना प्रार्दुभावामुळे हा संगीत महोत्सव होणार नाही.हेदेखील वाचा- Sale Of Jewellery: मुंबईत गुडीपाडव्याला दागिन्यांचा तब्बल 500 कोटींचा व्यापार बुडण्याची शक्यता

या महोत्सवात नवोदित कलाकारांना देखील यामाध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. यावर्षी संगीत महोत्सव रद्द झाल्याने प्रत्यक्षपणे मिळणारा हा आनंद गणेशभक्तांना मिळणार नाही. मात्र, दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु राहणार आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे.

दरम्यान भक्तांसाठी घरबसल्या ऑनलाईन दर्शनाची सोय देखील करण्यात आली आहे. ट्रस्टच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच सोशल मिडियाद्वारे ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांना या कोरोना काळात आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.