राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गेल्या दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा देत आहेत. आज त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याला भेट दिली आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि आयआयटीने देखील परिक्षा रद्द केल्या आहेत. तसेच राज्यपालांचे ज्ञान ऑक्सफोर्डपेक्षा अधिक असल्याचा टोलाही शरद पवारांनी लगावला आहे.
राज्य सरकारने विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून याचे कारण विचारले होते. तसेच भाजपनेही या निर्णयाचा विरोध केला होता. यावर शरद पवार म्हणाले की, "पदवीधरांची परीक्षा न घेण्याच्या विषयाचा विचार केला, तर भारतातील नामांकित विद्यापीठे तसेच जगातील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अन्य देशातील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशात जर खाजगी विद्यापीठे परीक्षा रद्द करण्याचा असा निर्णय घेत असतील, तर शासनाने घेतलेला निर्णयात चुकीचे कोणी केले आहे होत असे नाही. त्यामुळे राज्यपाल महोदयांना याची माहिती जास्त असेल असे मला वाटते." हे देखील वाचा- Mumbai Local Trains: मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करा; राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी
निसर्ग वादळामुळे कोकणातील अनेक भागात दाणादाण उडाली असून, शरद पवार यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी 2-3 दिवस दौरा केला आहे. शरद पवार यांच्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणचा दौरा करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. फडणवीसांच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून पवारांनी त्यांना चिमटा काढला आहे. “ते येत आहेत तर चांगले आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, त्यांच्या ज्ञानात भर पडेल,” असे पवार म्हणाले आहेत.