ठाणेकरांना उद्या (20 सप्टेंबर) पाणी मिळणार नसल्याची सूचना महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर महापालिकेच्या त्यांच्याच पाणीपुरवठा योजनेच्या आणि स्टेम प्राधिकरण यांच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्यासाठी पाणी पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्याचसोबत जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीचे सुद्धा काम करण्यात येणार आहे.
ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा उद्या सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तर पुढील दोन दिवस तरी नागरिकांना पाणीपुरवठा पुर्ववत होन नाही तोवर कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता सुद्धा महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी उद्यासाठी पाणीसाठा भरुन ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. (मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव देखील भरलं; एकूण पाणीसाठा 85.68 %)
तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे, माटुंगा आणि धारावी येथे तब्बल 30 तासांसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिकेकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. तसेच गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट ओढावणार असल्याची स्थिती निर्माण झाली होती. तर तलावात पाण्याचा साठा अतिशय कमी प्रमाणात झाल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी 10 टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. परंतु यंदा राज्यात झालेल्या पुरसेशा पावसामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव भरले असून त्यात एकूण पाणीसाठी 85.68 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.