Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

आज (4 ऑगस्ट) सकाळी ठाणे (Thane) शहरात विजेच्या खांब्याला स्पर्श केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.  कासारवडवली पोलिस स्थानकातील (Kasarvadavali Police Station) एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) ओवळा (Owala) येथील एका मंदिराजवळ उभी होती. त्यावेळी अनावधाने त्याने विजेच्या खांबाला स्पर्श केला आणि शॉक लावून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सकाळी 8.30 च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम साठी मृतदेह सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. तिथे मृताची ओळख पटवण्यात आली. दरम्यान काल रात्री पासून ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक दुर्घटना समोर येत आहेत. (पावसामुळे कांदिवलीच्या पश्चिम एक्सप्रेस हायवेवर दरड कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा Video)

ठाणे महानगरपालिकेचे विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले की, "वर्तकनगर परिसरातील एका इमारतीच्या छताचा काही भाग आज सकाळी कोसळला. मात्र सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पोहचले असून मदतकार्य सुरु आहे." (मुंबई, ठाणे, कोकणात पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता, IMD ने जारी केला रेड अलर्ट)

मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळ्याच्या घटना समोर आल्या. मात्र यात कोणतीही हानी झाली नाही. मुंबई सह ठाणे, पालघर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान उद्या देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच मुसळधार पावसामुळे घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे.