सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 रद्द करूनही समाजामध्ये समलैंगिक (Gay) लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही बदलला नाही. यामुळे आपली खरी ओळख लपवून फक्त कुटुंबासाठी किंवा समाजासाठी पुरुषांना लग्न करावे लागते. आता आपली अशीच गे असल्याची लैंगिक ओळख लपवून, लग्नानंतरही इतर अनेक पुरुषांशी चोरून समलैंगिक संबंध ठेऊन नवविवाहित पत्नीची फसवणूक केल्याप्रकरणी एका 32 वर्षीय पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकताच या तरुणाचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला. त्याच्या 29 वर्षीय पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. त्यावेळी या तरुणाने त्याच्या पगाराचे पॅकेज वार्षिक 14 लाख रुपये दर्शविणारे बनावट कागदपत्रे दाखवून हे लग्न केले. तक्रारदाराची बाजू मांडताना, वकील सागर कदम यांनी न्यायालयासमोर सादर केले की, त्यांच्या अशिलाला त्यांच्या हनीमून दरम्यान आरोपीच्या लैंगिक प्रवृत्तीबद्दल कळले.
जानेवारी, 2022 मध्ये पतीचा मोबाईल फोन तपासत असताना तिला आपल्या ओळखीच्या काही लोकांशी पतीचे व्हॉट्सअॅप चॅट आढळले. ते संभाषण नेहमीप्रमाणे साधे-सरळ नव्हते. या चॅटवरून पत्नीला संशय आला व तिने हा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला. तपासणीनंतर आढळले की, पतीचे इतर पुरुषांसोबत समलैंगिक संबंध होते. तसेच त्याचे समलिंगी डेटिंग अॅप्सवर खाती देखील होती. यानंतर महिलेने रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वकिलांनी पुढे नमूद केले की, आरोपीने लग्नाच्या वेळी इतकी महत्वाची माहिती लपवली तसेच, जेव्हा त्याच्या पत्नीला हे सर्व कळले तेव्हा त्याने तिला चाकूने धमकावले. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश एस गुप्ता यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. (हेही वाचा: चूनाभट्टी: माझा पती समलैंगिक आहे, माला वेश्या व्यवसाय करायला लावतो; डॉक्टर पतीवर पत्नीचा गंभीर आरोप)
दरम्यान, याआधी इंदूरमध्ये एका महिलेने आपल्या समलिंगी पतीच्या कृत्याने नाराज होऊन कोर्टात धाव घेतली होती. पीडित महिलेने न्यायासाठी न्यायालयात धाव घेण्याची ही तिसरी वेळ आहे. महिलेचा आरोप आहे की, पती त्याच्या समलिंगी मित्रासोबत काढलेले अश्लील फोटो तिला पाठवतो आणि तिला घटस्फोटासाठी दबाव टाकतो. ही महिला व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे आणि आधीच तिच्या पतीपासून वेगळी राहत आहे.