Photo Credit- Facebook

Thane Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुक 2024 ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंनी (Eknath Shinde)भाजपसोबत साठगाठ बांधली. उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गट पहिल्यांदा लोकसभा निवडणुक सामोरे गेला आहे. लोकसभा निवडणुकीचे (Thane Lok Sabha Election 2024)संपूर्ण टप्पे पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलने देशात एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र राज्यात शिंदेंच्या शिवसेनेला फक्त ६ जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा:Dharashiv Lok Sabha Election 2024: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर गड राखणार की घड्याळाची टिकटिक वाजणार; ठाकरे अन् पवारांची प्रतिष्ठा पणाला )

नरेश म्हस्के-

ठाणे लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. नरेश म्हस्के ठाण्याचे महापौरसुद्धा होते. २०१२ पासून ते ठाणे महापालिकेवर सातत्याने निवडून गेलेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यानंतर म्हस्के हे त्यांच्यासोबत गेले. ते सातत्याने शिंदे यांच्यासोबत दिसत होते. दरम्यान म्हस्केंच्या विरोधात ठाकरे गटाने २ टर्म खासदार राहिलेल्या राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे.ठाण्याच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच झाली होती, शेवटी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढत म्हस्केंना उमेदवारी देण्यात आली. परंतु त्याच म्हस्केंचं भवितव्य धोक्यात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

राजन विचारे-

नरेश म्हस्के यांची लढत ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्याशी आहे. या लढतीकडे शिलेदार विरुद्ध निष्ठावान, म्हणून पाहिली जात आहे. राजन विचारे हे दोनवेळा खासदार झाले आहेत. त्यामुळे ते तिसऱ्यांदा दिल्ली गाठतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरे गटाचे राजन विचारे हे नरेश म्हस्के यांना पराभूत करतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभेच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात ठाण्यात मतदान प्रक्रिया पार पडली. ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील वेळी ५० टक्के मतदान झाले होते. यावेळी हा मतांचा टक्का दोन टक्क्यांनी वाढला. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात ५२.०९ टक्के मतदानाची नोंद झालं.