Photo Credit- Facebook

Dharashiv Lok Sabha Election 2024: उस्मानाबादचे धाराशिव(Dharashiv)नामांतर झाल्यानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली आहे. त्याशिवाय इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना(Sena vs Sena) असा सामना होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर(Omraje Nimbalkar)यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अर्चना पाटील खासदार बनणार की ओमराजे निंबाळकर हे काही तासांतच समजणार आहे. शिवाजी कांबळे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा धारशिवचे खासदार बनण्याचा सन्मान एकही उमेदवारास मिळाला नाही. त्यामुळे अनेकांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. (हेही वाचा: Beed Loksabha Election 2024: बीडमध्ये कोण ठरतयं वरचढ? पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे; लोकसभा मतदारसंघात कुणाची बाजी)

दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून यंदा ओमराजे नवा विक्रम रचतात की, सासरे पद्मसिंह पाटील यांच्यानंतर अर्चना पाटील खासदार बनून दिल्लीला पोहोचतात हे लवकरच समजेल.धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शी, तुळजापूर, कळंब, औसा, उमरगा आणि भूम-परांडा-वाशी या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या 6 पैकी 5 मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. तर, केवळ कळंब मतदारसंघात कैलास पाटील हे शिवसेना महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे, महायुती प्रबळ असून ओमराजे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्येक मतदारसंघातील थेट जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी बाजी मारली.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी येथील मतदान झालं. 6 विधानसभा मतदारसंघ असलेल्या धाराशिव लोकसभेसाठी 63.88 टक्के मतदान झाले. गत 2019 च्या तुलनेत ही टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं. वाढलेल्या टक्केवारीचा थेट फायदा ओमराजे यांनाच झाल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात गत निवडणुकांच्या तुलनेत यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानेही लक्ष वेधले होते. त्यामुळे, वंचितचे भाऊसाहेब आंधळकर ह्यांच्या मतांकडेही मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

2019 च्या निवडणुकीत 1.27 लाख मतांनी विजय

2004 साली कल्पना नरहिरे येथून धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेच्या खासदार बनल्या. तर, 2009 साली राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर पद्मसिंह पाटील केवळ 6,787 मतांनी विजयी झाले. शिवसेनेच्या विजयाची परंपरा त्यांनी मोडित काढली. मात्र, पुन्हा 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत रविंद्र गायकवाड हे धनुष्यबाण चिन्हावर 2 लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन दिल्लीला पोहोचले. 2019 च्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना तिकीट देण्यात आले. ओमराजे यांनीही 2019 ची निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढवली अन् राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटील यांना पराभूत करत ते 1 लाख 27 हजार मतांनी विजयी झाले.