ठाणे: शहापूर तालुक्यामध्ये वाढतेय बिबट्याची दहशत; वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Leopard | Representational image (Photo credits: Wikimedia Commons)

ठाणे (Thane) जिल्ह्याच्या शहापूर (Shahpur)  तालुक्यातील शिरोळ (Shirol) वनपरिक्षेत्रातील अजनुप आणि नजिकच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता वनविभागाकडूनही या परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान वनविभागानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे वृत्त लोकसत्ताकडून देण्यात आले आहे.

काही महिन्यांपूर्वी ठाण्यामध्ये कोरम मॉल जवळ बिबट्याचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. आता अजनूप विभागात मागील 2-3 दिवसांपासून बिबट्या दिसत असल्याने तसेच त्याचा वावर असल्याने स्थानिकांची भंबेरी उडाली होती. यामध्ये मंगळवार (12 नोव्हेंबर) च्या सकाळी एका बकरी फार्म मध्ये 2 बकर्‍यांना बिबट्याने खेचून नेल्याची घटना देखील समोर आली आहे. त्यामुळे शिरोळ विभागाचे वनपाल विजय गायकवाड आणि त्यांच्या सहकारी व वनरक्षकांनी या भागात पाहणी करून बिबट्याच्या पायाचे ठसे पाहिले आहेत.

ठाण्यात शहापूर जवळ जंगलात व शेतावर नदीकाठी वावरत असलेल्या परिसरामध्ये लोकांनी जाऊ नये, शेतावर जाऊ नये, नदीकाठी व जंगलात जाऊ नये असे आवाहन देखील करण्यात आलं आहे. तसेच रात्रीची गस्त वाढवण्यासाठी वन विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. मात्र विजय गायकवाड यांनी बकर्‍यांवर झालेल्या हल्ल्याबाबत तसेच बिबट्याने त्यांना खाल्ल्याबद्दल कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ज्या फार्म मधून बिबट्याने बकर्‍या खाल्ल्याचा दावा करण्यात आला नसल्याचं सांगत फार्म मालकाने उरलेल्या 40 बकर्‍या खर्डी येथे स्थलांतरित करण्यात आल्याचं म्हटलं आहे.