
कोरोना संकटकाळामध्ये वाढत्या रूग्णसंख्येचा ताण आरोग्य संस्थांवर आला आहे. दरम्यान यामधूनच आता ठाण्यामध्ये पालिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची अदलाबदल झाल्याने एका कुटुंबावर दोनदा अंत्यसंसकार करण्याची वेळ आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान पालिका हॉस्पिटल आणि कुटुंब या दोन्हींकडून चूक झाल्याचे समजते आहे. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबाकडून सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्म भरून या प्रकारणाला शांत करण्यात आलं आहे. Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 23 हजार 724 वर.
द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट नुसार, संतोष सोनावणे यांनी काल (8 जुलै) त्यांच्या वडिलांच्या मृतदेहावर अंतिमसंस्कार केले. मात्र चार दिवसांपूर्वी त्यांनी अंत्यसंस्कार केलेला मृतदेह हा त्यांच्या वडिलांचा नसून भालचंद्र गायकवाड यांचा होता. दरम्यान गायकवाड कुटूंब मागील काही दिवसांपासून त्यांच्या मृतदेहाची प्रतिक्षा करत होते. हॉस्पिटलकडून भालचंद्र गायकवाड यांचा मृतदेह गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर चूक लक्षात येताच 72 वर्षीय गायकवाड यांच्यावर सोनावणे कुटुंबाकडून अंत्यसंस्कार झाल्याचं समजलं.
सोनावणे कुटुंबाला अनावधाने त्यांच्याकडून गायकवाडांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले असून सोनावणे जीवंत असल्याचं फोनवर सांगण्यात आले. या बातमीने सोनावणे कुटुंबाला आनंदाचा धक्का बसला, मात्र दुर्देवाने हा आनंद फार काळ टिकला नाही. काही तासांतच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी देणारा पुन्हा दुसरा कॉल आला. दुसर्यांदा सोनावणे कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहचले तेव्हा त्यांना मृतदेहाची पक्की ओळख पटकवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर हा सोनावणे यांचाच मृतदेह असल्याची खात्री करून घेण्यात आली.
दरम्यान गायकवाड कुटुंबाला देखील मृतदेहाच्या अदलाबदलीची माहिती देण्यात आली. यावर आता गायकवाड कुटुंब कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे. तर सोनावणे कुटुंबाने दावा केला आहे की, मृतदेह हा संपूर्ण गुंडाळलेला असेल तर नेमकी त्याची ओळख पटवायची कशी?
ठाण्याच्या या कोरोना रूग्णांच्या मृतदेह अदलाबदली बद्दल आता राजकारण देखील रंगायला लागलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हा प्रकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे नेला असून त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विचारणा करायला देखील सांगितले आहे. सध्या ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे म्युनिसिपल कमिशनर डॉ. विपीन शर्मा यांना पत्र लिहून या मृतदेह अदलाबदल प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचार्यांवर कठोर कारवाई कारण्याची मागणी केली आहे.