Thane Bandh | (Photo credit: archived, edited, representative image)

Maratha Reservation Agitation Thane: मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी जालना येथे केलेल्या लाठीचार्ज (Lathi-Charge) प्रकरणाचे तीव्र पडसाद संबंध महाराष्ट्रात उमठत आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी बंद आणि आंदोलने केली जात आहेत. ठाणे जिल्ह्यातील सकल मराठा मोर्चा (Sakal Maratha Morcha) आक्रमक झाला आहे. परिणामी मराठा संघटनांनी आज ठाणे बंदची हाक दिली आहे. संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आज (11 सप्टेंबर) ठाणे बंद ठेवण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) पाठिंब्याने ठाणे येथे सकल मराठा मोर्चा द्वारा पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला महाराष्ट्रातील तमाम विरोधी पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. ठाण्यातील विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची एक बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत बंदला एकमताने पाठींबा देण्याचा निर्णय झाला. तसेच, ठाण्यातील नागरिकांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन पाठिंबा देण्यात यावा असे अवाहन करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष सुहास देसाई, शिवसेना (यूबीटी) पक्षाचे प्रदीप शिंदे, मनसे नेते रवींद्र मोरे, अविनाश जाधव, मराठा क्रांती मोर्चाचे शहरप्रमुख रमेश आंब्रे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरु आहे. पोलिसांनी आंदोलनस्थळी लाठीचार्ज केला आणि वातावरण अचानक बदलले. या लाठीचार्जचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. आंदोलनालाही हिंसक वळण लागले, त्यात डझनभर पोलिसही कर्मचाऱ्यांसह अनेक लोक जखमी झाले.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी . सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात तैनात असतील असे समजते. खास करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवास्थानही याच शहरात असल्याने चोख बंदबस्त आहे. अनुचीत प्रकार अथवा आणिबाणीसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास शहरात 45 निरीक्षक, सुमारे 160 साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, सुमारे 1 हजार 300 कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकांच्या दोन तुकड्या, राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या तैनात असणार आहेत. जेणेकरुन परिस्थिती नियंत्रणात राहील आणि येईल.