Thane: 24 वर्षीय युवकाचा शेजारी राहणाऱ्या 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांकडून अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील ठाणे (Thane) शहरात आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी, 24 वर्षीय व्यक्तीला मंगळवारी अटक करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी दीपेश सुतार हा कुरिअर कंपनीचा कर्मचारी असून, पीडित मुलगी जिथे राहते त्याच, लोकमान्य नगर पाडा क्र. 2 चाळीत तो राहतो. याबाबत वर्तक नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस बी गायकवाड यांनी माहिती दिली. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. घरात कोणी नाही हे पाहून दीपेशने या मुलीला जबरदस्तीने आपल्या घरी नेले व तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर मुलीला प्रचंड वेदना होऊ लागल्या व तिने ताबडतोब घरी पोहचून घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिली. आईने ताबडतोब याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून या अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराची पुष्टी केली आणि आरोपीला अटक केली. (हेही वाचा: धक्कादायक! लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघांना अटक)

सुतार याच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नुकतेच नांदेडमधील बिलोली (Biloli) तालुक्यातील 4 शिक्षकांनी, इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याने खळबळ उडाली होती. सध्या पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात या चार शिक्षकांविरोधात पॉक्सो कायदा तसेच कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.