अनुप डांगे यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी Param Bir Singh यांच्या चौकशीचे ठाकरे सरकारचे आदेश
Param Bir Singh (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. गावदेवी पोलीस ठाण्यातील तत्कालीन निरीक्षक अनुप डांगे (Anup Dange) यांनी परमबीर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सिंह यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) यांना चौकशीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अनुप डांगे यांनी 2 फेब्रुवारी रोजी राज्याच्या अतिरिक्त गृह सचिवांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनुप डांगे यांचे मागील वर्षी निलंबन करण्यात आले होते. ते निलंबन रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांनी 2 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसंच परमबीर सिंह यांचे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी संबंध असल्याचे गंभीर आरोपही पत्रात करण्यात आले आहेत. दरम्यान, याच आरोपांची चौकशी करुन अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे आदेश आता देण्यात आले आहेत. (Parambir Singh Case: परमबीर सिंह प्रकरणात अनिल देशमुख, महाविकासआघाडी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका)

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांना देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुल करण्याचे टार्गेट दिले होते, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. त्यानंतर आता परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप होताना दिसत आहेत. अनुप डांगे यांच्यानंतर अकोला पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी देखील पत्र लिहून परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यासंबंधित पुरावे देखील माझ्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घाडगे यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्राची पत पाठवली आहे.