Bombay High Court | (Photo Credits-ANI)

बॉम्बे हायकोर्टाने (Bombay High Court) शुक्रवारी गर्भपातासंबंधी एक मोठा निर्णय सुनावला. न्यायालयाने एका आईच्या 24 आठवड्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्यासाठी परवानगी दिली आहे. भारतामधील कदाचित ही पहिलीच घटना असेल. या महिलेच्या गर्भात तीन मुले आहेत, ज्यांचा गर्भपात करण्यास न्यायालयाने संमती दर्शवली आहे. जेजे हॉस्पिटलच्या पॅनेलने महिलेचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन गर्भपात करण्याची शिफारस केली होती. गर्भपातासाठी 41 वर्षीय महिलेच्या वतीने याचिका दाखल केली होती. या महिलेच्या गर्भात तीन मुले असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.

तिन्ही गर्भापैकी फक्त एकाच गर्भाचे आरोग्य सुस्थितीत होते, त्यामुळे ही महिला सतत तणावाखाली होती. हे लक्षात घेऊन गर्भपाताची याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने डॉक्टरांच्या पॅनेलकडे याबाबत अहवाल मागितला होता. महिलेच्या तीनही गर्भांची तपासणी करून अहवाल देण्यास सांगितले होते. पॅनेलचा तपास आणि अहवाल आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गर्भधारणा संपुष्टात आणण्यास परवानगी दिली.

12 मे रोजी खंडपीठाने केवळ एक गर्भ संपुष्टात येण्याच्या शक्यतेचा अहवाल मागविला होता. यानंतर, 17 मे रोजी पुन्हा आणखी एक पॅनेल तयार करण्यात आले आणि त्यांच्याकडे मत मागितले. 20 मे च्या पॅनेलच्या अहवालात असे म्हटले आहे की, पहिल्या गर्भात Encephalopathy दिसून आली आहे, म्हणजेच तो जिवंत राहणार नाही. दुसऱ्या भृणामध्ये अनुवंशिक विकृती असेल. मात्र यामधील एकच भृण ठीक असल्याने फक्त त्यालाच जन्म देणे शक्य नाही. पॅनेलने कोर्टाला असेही सांगितले की, गर्भधारणा अशीच चालू ठेवली तर त्याचा महिलेच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. (हेही वाचा: एक, दोन नव्हेतर चक्क 13 मुलांशी केले लग्न, सर्वांनाच फसवले; तरूणांना लुटून पळून जाणाऱ्या तरुणीला अखेर अटक)

ही महिला 41 वर्षांची असून, हे गरीब कुटुंब आहे. महिलेचा पती ड्रायव्हर असून तो दरमहिना 12 हजार ते 15 हजार रुपये कमावतो. या महिलेवर यापूर्वी मानसिक उपचार करण्यात आले आहेत. अशा सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी दिली आहे.