तरूणाशी लग्न लावून त्यांना लुटून पळून जाणाऱ्या एका तरूणीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. ही तरूणांशी लग्न केल्यानंतर त्यांना चिक्कार लुटायची आणि पळून जात होती. तिने आतापर्यंत एकूण 13 जणांशी लग्न केले आहे. या सर्वांची तिने फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, ती एकटी नसून तिच्यापाठीमागे मोठी टोळी असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे. वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न जुळवण्यासाठी ही टोळी विविध शहरांमधील दलालांची मदत घ्यायची. मात्र, नंदुरबार येथील एका कुटुंबियाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या टोळीला अटक केली आहे. दरम्यान, तरूणीची आई आणि भाऊ दोघेही फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सोनू शिंदे असे अटक करण्यात आलेल्या तरूणीचे नाव आहे. या तरूणीने दोन आठवड्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातल्या मंदाने येथील एका तरूणाची लग्न केले. यावेळी लग्नसाठी वधू पक्षाकडून नवरदेवाकडे काही लाखांची मागणी केली. त्यानंतर नवरदेवाच्या कुटुंबियांनी वधू पक्षाला पैसेही दिले. पण लग्न झाल्यानंतर नवरी नांदलीच नाही. ती पळून गेली. घरात आलेली नवी नवरी अचानक पळून गेल्यानंतर संबंधित कुटुंबाला मोठा झटका बसला. आपण लुबाडलो गेलो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. हे देखील वाचा- Mumbai: 25 ऑक्सिजन सिलेंडर आणि 12 ऑक्सिजन किट्स जमा केल्याप्रकरणी एकाला अटक
त्यानंतर आरोपी मुलगी शिंदखेडा तालुक्यातील एका तरूणाशी लग्न करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, पोलीस आपला तपास करत असल्याचा सुगावा या टोळीला लागला. त्यानंतर त्यांनी थेट लग्नाचे ठिकाणच बदलून अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात ठेवले. यासदंर्भात माहिती मिळताच पोलिसांनी अगदीच वेळेवर म्हणजे लग्न लागण्या आधीच लग्न मंडपातून सोनू शिंदे टोळीला अटक केली आहे. परंतु, नवरीची आई आणि भाऊ पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.
या टोळीने खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेकांकडून लग्न लावून पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भविष्यातील अनेकांची फसवणूक टळली आहे. या संदर्भात टीव्ही9 मराठीने माहिती दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खान्देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.