
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) सोमवारपासून महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान ते पंढरपूर आणि तुळजापूरला भेट देणार आहेत. भारत राष्ट्र समितीच्या (BRS) पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली. के चंद्रशेखर राव त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळासह आणि बीआरएसचे सुमारे 400 निवडून आलेले प्रतिनिधी यांच्यासह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.
बीआरएस पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. बीआरएस अधिकाऱ्याने सांगितले की, राव सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे पोहोचतील आणि त्यानंतर सोलापूरला रवाना होतील. यानंतर मंगळवारी ते सोलापूरच्या पंढरपूर शहरातील विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पूजा करतील.
राव सोलापूरच्या सरकोली गावात स्थानिक पातळीवर आयोजित कार्यक्रमात देखील सहभागी होतील आणि नंतर उस्मानाबादमधील तुळजापूरला रवाना होतील, जिथे ते मंगळवारी दुपारी प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिरात दर्शन घेतील. केसीआर यांच्या धार्मिक स्थळांच्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. ते महाराष्ट्रात त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षासाठी मैदान तयार करत आहेत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये, बीआरएसने संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल होर्डिंग लावले आहेत जेणेकरून लोकांना त्यांच्या पक्षाबद्दल माहिती मिळावी. पंढरपूरकडे जाणार्या मार्गांवर त्यांची प्रचार मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. बीआरएस किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम म्हणाले की, ते महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 आणि विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. त्यांच्याकडे सर्व जागांसाठी उमेदवार आहेत व निवडणुकीची तयारी सुरू आहे. बीआरएस कोणत्याही स्थानिक पक्षाशी युती करणार नाही. बीआरएस येत्या काही महिन्यांत नागपूर आणि सोलापूरमध्ये जाहीर सभा घेऊ शकते. (हेही वाचा: Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्या; शिंदे गटातील अनेकांना मत्री होण्याची 100% खात्री, इच्छुकांचा दावा)
तेलंगणाबाहेर संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने राव यांनी 15 जून रोजी नागपुरात पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. याशिवाय राव यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या काही भागांत सभा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर शेतकरी आणि दलितांच्या प्रश्नाबाबत टीका केली होती. राव म्हणाले होते की, तेलंगणात 24 तास वीज आणि पाणी पुरवठ्यामुळे तेथील शेतकरी आत्महत्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केसीआरच्या नेतृत्वाखालील पक्षाने अखिल भारतीय पक्ष बनण्याच्या उद्देशाने तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले.