Tejas Express (Photo Credits: ANI)

जर आपण तेजस एक्स्प्रेसने मुंबई ते अहमदाबाद (Mumbai Ahmedabad Tejas Express) असा प्रवास करत असाल आणि या प्रवासादरम्यान तुमच्या घरी चोरी झाली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रवाशांनी तणावमुक्त प्रवास करता यावा यासाठी भारतीय रेल्वेने प्रवास कालावधीत घरातील चोरी किंवा दरोडेखोरीविरूद्ध एक लाख रुपयांचा विमा संरक्षण देण्याची सुविधा सुरु केली आहे. प्रवाशांना चोरीची रक्कम ही विम्याच्या माध्यमातून परतफेड केली जाईल. हा विमा तिकिटाचाच एक भाग असणार आहे.

आयआरसीटीसीच्या संचालक (पर्यटन व विपणन) रजनी हसीजा यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, “ही संकल्पना आश्चर्यकारक वाटेल पण हे खरे आहे की प्रवासात तुमच्या घरात चोरी झाल्यास आयआरसीटीसी 1 लाख रुपयांचा विमा संरक्षण तुम्हाला देणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना कोणतीही रक्कम देण्याची गरज नाही. "

या सुविधेअंतर्गत प्रवाशाला चोरीची एफआयआर नोंदवावी लागेल आणि चोरी झाल्याचं सिद्ध झाल्यास आयआरसीटीसी विम्याची रक्कम देईल.

यासंदर्भात रेल्वे आणि लिबर्टी जनरल विमा कंपनी लिमिटेड यांच्यात एक करार झाला आहे.

आता ही सेवा फक्त तेजस एक्स्प्रेससाठी उपलब्ध आहे. तरीही, एका अहवालानुसार, रेल्वेच्या पहिल्या खासगी सेमी हाय-स्पीड ट्रेनमध्ये प्रवास करणार्‍या बहुतांश प्रवाश्यांना या सुविधेची माहिती नाही.

मुंबई- अहमदाबाद तेजस एक्सप्रेस जानेवारी 2020 पासून प्रवाशांच्या सेवेत होणार रुजू; 'हे' आहे वेळापत्रक

दरम्यान, दिल्ली-लखनौ मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये सध्या प्रवाशांच्या सामानासाठी रेल्वे विमा संरक्षण देण्यात येत नाही. आयआरसीटीसीचा असा दावा आहे की चोख बंदोबस्त सुरक्षा व्यवस्थेमुळे चोरी किंवा दरोड्याच्या घटना घडण्याची शक्यता कमी आहे. ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत; म्हणूनच, बेकायदेशीर बोर्डिंग होण्याची शक्यता नाही. लखनौ-दिल्ली मार्गावरील तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन असल्याचे समजते. तसेच ही ट्रेन सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी सज्ज आहे.

तसेच देशातील पहिल्या वाहिल्या खासगी तेजस एक्सप्रेसची आता मुंबई- अहमदाबाद ही नवी कोरी सेवा जानेवारी 2020 पासून सुरु होणार आहे.