Tantrik Baba Arrested by Mumbai Police: पतीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेऊन त्यावर परस्परच तोडगा काढणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेला एका तांत्रिकाने आर्थिक गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही महिला पतीला त्याच्या कथीत प्रेयसीपासून दूर करण्यासाठी एका तांत्रिकाकडे गेली. या तांत्रिकाने तिच्याकडे चक्क 1.6 लाख रुपयांची मागणी केली. या पैशांच्या बदल्यात पतीची प्रेयसी अवघ्या 13 दिवसांमध्ये गायब करतो, असेही सांगितले. या प्रकरणात 10,000 रुपये घेतलेप्रकरणी मुंबई पोलिसांनी 34 वर्षीय तांत्रिकाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना मुंबई येथील खेरवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडली.
मुंबई पोलिसांनी विकास उनियाल नामक आरोपीला अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि तांत्रिक बाबा असल्याचा दावा केल्याचा आरोप आहे. विकास उनियाल याने नसरीन एफ (वय-33 वर्षे) या महिलेकडे एकूण 1.6 लाख रुपयांची मागणी केली. या पैशांच्या बदल्यात त्याने नसरीन हिला तिच्या पतीची प्रेयसी अवघ्या 13 दिवसांमध्ये गायब करण्याचे अश्वासन दिले. धक्कादायक म्हणजे महिलाही त्याच्या आमिशाला बळी पडली. तिने 10,000 हजार रुपये तांत्रिक बाबा विकास उनियाल याला दिले. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंत पोलिसांनी आरोपीला वांद्रे (पूर्व) इथून अटक केली. (हेही वाचा, Kolhapur Black Magic: मुलींच्या फोटोंवर हळद-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू; वशीकरण, करणीच्या नावाखाली कोल्हापूरमध्ये अघोरी प्रकार)
अधिक माहिती अशी की, पीडिता नसरीन या महिलेचा पती इब्राहीम (वय-35 वर्षे) याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून तो या व्यवसायात आहे. त्याला आपली पत्नी तांत्रिकाडे गेली असून त्याने तिच्याकडून पैसे उकळल्याचा संशय आला. इब्राहीम याला एका रिक्षा चालकाने फोन करुन सांगितले की, त्याची पत्नी नसरीन एका तांत्रिकाकडे गेली आहे. त्याने तिच्याकडे 1.6 लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यापैकी 10,000 रुपये तिने त्याला दिले आहेत. शिवाय, तुझी कथीत प्रेयसी 13 दिवसात गायब करण्याचेही अश्वासन त्याने तिला दिले आहे. तसेच, नसरीन ही तांत्रिकाला भेटण्यासाठी निघाली असून त्यासाठी तिने आपलेच वाहन भाड्याने घेतल्याचे सांगितले इब्राहीम याला सांगितले.
दरम्यान, इब्राहीम याने पुढे सांगितले की, रिक्षाचालक मित्राने त्याची पत्नी आणि तांत्रिकाचे बोलणे रेकॉर्ड केले. त्यानंतर त्याचा सर्व प्रकारावर विश्वास बसला. मी जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा पत्नीने तांत्रिकाला 10,000 रुपये दिल्याचेही आपल्या लक्षात आल्याचे इब्राहीम याने म्हटले. त्याने पुढे सांगितले की, आपल्या पत्नीने तांत्रिकाच्या नादी लागून आतापर्यंत 5 लाख रुपये खर्च केले आहेत.