महाराष्ट्रात आतापर्यंत स्वाईन फ्लू आजाराने 212 जणांचा मृत्यू, आरोग्य विभागाची माहिती
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लू (Swine Flu) आजार वाढत आहे. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील विविध राज्यात एका महिन्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 212 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभाकडून समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूचा आकडा नागपूर मधील असून येथील 42 जण स्वाईन फ्लू आजाराचे बळी पडले आहेत. नाशिक येथे 33 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 9 महिन्याची आकडेवारी पाहता स्वाईन फ्लूमुळे 2207 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर जानेवारी महिन्यापासूव ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 368 रुग्ण आढळले आहेत. त्याचसोबत सप्टेंबर महिन्यात 5 पेक्षा अधिक जणांचा स्वाईन फ्लू झाल्याने डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यात स्वाईन फ्लू आजार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या आजारपणापासून वाचण्यासाठी योग्य ते उपचार वेळेवर घ्यावेत असे सांगण्यात येते. तर रोगप्रतिकारक शक्ती ज्या व्यक्तीच्या अंगात कमी असते अशा व्यक्तीला स्वाईन फ्लू होण्याची शक्यता फार असते.(मुंबईत 'स्वाईन फ्लू' चा पहिला बळी, केईएम रुग्णालयात तरुणीचा मृत्यू)

स्वाईन फ्लू ची लक्षणे:

ताप येण्यासोबत सर्दी, घसा सुजणे, छातीत कफ जमा होणे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास H1N1 ची तपासणी जरुर करा. त्याचबरोबर तीन दिवसांपेक्षा अधिक वेळ 101 डिग्रीवर ताप असल्यास, थकवा जाणवत असल्यास, भूक कमी लागत असल्यास त्याचबरोबर उलटी होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अशी घ्या खबरदारी:

# वारंवार डोळ्यांना , नाकाला व तोंडाला हात लावणे टाळा.

# अस्वच्छ व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

# तुमच्या परिसरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असेल तर बाहेर जाताना मास्कचा वापर करा.

# खोकताना किंवा शिंकताना तोंडावर-नाकावर रुमाल ठेवा.

# फ्लू ची लागण झालेल्या व्यक्तीपासून लांब राहणेच योग्य ठरेल. अशा व्यक्तींच्या वस्तू वापरणे टाळा.

तसेच स्वाईन फ्लू च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येते. तर स्वाईन फ्लू चे व्हायरस पावसाळ्यानंतर थंडीत सर्वाधिक अॅक्टीव्ह होतात. यापूर्वी देशात स्वाईन फ्लू चे अनेक बळी गेले आहेत. देशात स्वाईन फ्लू पसरत असताना काही खास नियमांचे पालन केल्यास त्यापासून बचाव होऊ शकतो.