Surgical Strike 2: आजचा भारत हा पूर्वीचा भारत राहिला नाही. भारतीय लष्कराचा आणि वायुसेनेचा अभिमान वाटतो. शक्ती काय असते हे खऱ्या अर्थाने पाकिस्तानला समजले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी भारतीय लष्कराला सर्व अधिकार दिले होते. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis) यांनी भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. भारतीय हवाई दलाच्या 12 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांची कंट्रोल रुम उदद्ध्वस्त केली. रात्रीच्या अंधारात पहाटे 3 वाजता ही कारवाई केली. दरम्यान, गेल्या काही तासांपासून भारतीय हवाई दलाची (Indian Air Force) विमाने सीमारेषा (Line of Control) ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत (पाकव्याप्त काश्मीर) घुसत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत सुमारे 200 दहशतवादी ठार झाले. भारतीय जनतेच्या मनात जे होते तेच भारतीय लष्कराने केल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच, देशावर होणारे सर्व प्रकारचे हल्ले परतवून लावण्यात भारत सक्षम आहे. भारतीय लष्कराच्या शक्तीबाबत मला अभिमान असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले; जैश-ए-मोहम्मदची कंट्रोल रुम उद्ध्वस्त)
दरम्यान, पाकिस्तानकडूनही या कारवाईबाबत उलट प्रतिक्रिया मिळू शकते. मुंबईही हाय अलर्टवर आहे का, असे विचारले असता, भारताच्या गुप्तचर संस्था आणि सर्व यंत्रणा सक्षम आहेत. सर्व पातळ्यांवर काम सुरु आहे. मुंबई नेहमीच हाय अलर्टवर असते. मुंबई हाय अलर्टवर असते याचा अर्थ नागरिकांनी पॅनिक व्हायची गरज नाही. सर्व यंत्रणा आपापल्या पातळीवर योग्य काम करत असतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळ सांगितले.