Summer Specials Trains: भारतीय रेल्वे मुंबई, शिर्डी, पुणे येथून वेगवेगळ्या ठिकाणांसाठी चालवणार विशेष 574 उन्हाळी गाड्या; जाणून घ्या सविस्तर
Express Trains | (Photo Credit: Archived, Edited, Representative Images)

जर तुम्ही या उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. नियमित गाड्यांमधील प्रचंड गर्दी आणि लांबलचक प्रतीक्षा यादी लक्षात घेऊन, मध्य आणि पश्चिम रेल्वेद्वारे (Western and Central Railway) देशातील विविध गंतव्यस्थानांसाठी 968 उन्हाळी विशेष ट्रेन (Summer Specials Trains ) सेवा चालवल्या जात आहेत. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे 574 गाड्या पश्चिम रेल्वेद्वारे 394 गाड्या समाविष्ट आहेत.

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची वाढीव गर्दी कमी करण्यासाठी एप्रिल ते जून 2022 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे, नागपूर आणि साईनगर शिर्डी येथून विविध स्थळी 574 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. (हेही वाचा: देशांतर्गत प्रवासासाठी RTPCR चाचणीची आवश्यकता नाही; राज्यांबाबत राज्य सरकार घेऊ शकतात निर्णय- Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia)

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड, नागपूर, मालदा टाउन आणि रीवा दरम्यान 126 उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जातील. दादर ते मडगाव दरम्यान 6 उन्हाळी स्पेशल गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, समस्तीपूर आणि थिविम दरम्यान 282 उन्हाळी विशेष गाड्या, पनवेल ते करमाळी दरम्यान 18 उन्हाळी स्पेशल गाड्या, नागपूर ते मडगाव दरम्यान 20 उन्हाळी स्पेशल गाड्या, पुणे आणि करमाळी, जयपूर, दानापूर, विरांगना लक्ष्मीबाई स्टेशन आणि कानपूर सेंट्रल दरम्यान 100 उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जातील.

तसेच साईनगर शिर्डी आणि दहार का बालाजी दरम्यान 20 उन्हाळी विशेष व लातूर आणि बिदर दरम्यान 2 उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जातील. या सर्व उन्हाळी स्पेशलचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. प्रवासी www.irctc.co.in वर लॉग इन करू शकतात किंवा आरक्षणासाठी जवळच्या संगणकीकृत आरक्षण केंद्राला भेट देऊ शकतात. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे योग्य वर्तन पाळावे, असे मध्य रेल्वेच्या पीआरने म्हटले आहे.