सुमती नार्वेकर, महाराष्ट्रातील सर्वाधिक 92 वर्षीय रूग्णाची कोरोनावर मात; असा  होता पालिका ते Neon Hospital मधील 10 दिवसांचा संघर्ष
Sumati Narvekar | File Photo

भारतासह जगभरात सध्या मनुष्यजातीचं कोरोनाशी (Coronavirus) 'वॉर व्हर्सेस व्हायरस' सुरू आहे. मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातही त्याची दहशत आहे. या कोव्हिड 19च्या छुप्या युद्धामध्ये इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मृत्यूला ही नमवता येतं ही जिद्द एका 92 वर्षीय आजीबाईंनी दाखवली आहे. सुमती नार्वेकर (Sumati Narvekar) या कोव्हिड योद्धेने 17 जून दिवशी कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई जिंकली आहे. सुरूवातीला केडीएमसीच्या पालिका (KDMC Hospital) रूग्णालयामध्ये आणि नंतर निऑन हॉस्पिटलमध्ये (Neon Hospital) सुमती नार्वेकर यांच्यावर उपचार झाले. मात्र सुमारे 10 दिवसांच्या उपचारानंतर आता त्या ठणठणीत बर्‍या झाल्या आहेत.

सरकारने सुरूवातीपासूनच साठी पार ज्येष्ठांना कोरोनापासून सांभाळा असा सल्ला दिला होता मात्र कळत नकळत सुमती नार्वेकर यांना कोरोनाची बाधा झाली. ताप येऊन जाऊन असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी कोरोनाची टेस्ट करून घेतली आणि ती पॉझिटिव्ह आली. 90च्या पार असलेल्या सुमती यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी पालिका रूग्णालयामधून खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्याचा निर्णय घेतला. वय जास्त असल्याने त्या कोव्हीड 19 च्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये होत्या. मात्र अशावेळी डोंबिवलीमध्ये व्हेंटिलेटर आणि आयसीयूची अद्ययावत सुविधा असलेल्या निऑन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. 'सुमती यांना दाखल केले तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि सॅच्युरेशन लेव्हल' अत्यंत कमी होती. त्यामुळे धोका अधिक होता. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी कोव्हिडचंही संकट परतवून लावलं' असं निऑन हॉस्पिटलचे संचालक मिलिंद शिंदे सांगतात.

दरम्यान महाराष्ट्रामध्ये वयाच्या 92 व्या वर्षी कोरोनावर मात करणार्‍या सुमती नार्वेकर या पहिल्या कोरोना योद्धा आहेत. 8 जून ते 17 जून दरम्यान त्यांच्यावर निऑन हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि त्यांनी ही लढाई जिंकली आहे. सुदैवाने त्यांना इतर आजारांचा धोका नव्हता. त्यांची रोगप्रतिकारशक्ती, फुफ्फुसांची क्षमता चांगली असल्याने कोरोना विरूद्ध त्यांची लढाई यशस्वी ठरली आहे. हॉस्पिटलमधून सुट्टी देताना त्यांचं फुलं देऊन अभिनंदन देखील करण्यात आलं. दरम्यान त्यांच्या सुनेलाही कोरोनाची लागण झाली होती त्यांनीही कोरोनावर मात केली आहे.   Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 3307 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 1,16,752 वर.  

Sumati Narvekar | File Photo

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आजही दाट आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने आणि अद्याप यावर ठोस औषध नसल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आलं आहे. दरम्यान कोरोनाची लक्षणं दिसल्यास ती लपवून न ठेवता वैद्यकीय मदत घ्या आणि या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मदत करा. असं आवाहन सरकार आणि डॉक्टरांकडून करण्यात आलं आहे. सुमती नार्वेकर या अनेकांसाठी आता प्रेरणा ठरल्या आहेत.