मंत्रालयाच्या परिसरात शुक्रवारी (18 जानेवारी) पुन्हा एकदा एका जेष्ठ महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून मंत्रालयाच्या गेटसमोर आत्महत्या करण्याच्या जेष्ठ महिलेने प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी तातडीने तिला ताब्यात घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न टळला आहे.
शारदा कांबळे असे या महिलेचे नाव आहे. शारदा ह्या चेंबूर इथे राहत असून त्यांनी एक चिठ्ठी लिहीली आहे. त्यामध्ये सावकार उदय रघु शेट्टी आणि दलाल मिना पगारे यांची नावे देण्यात आली असून माझ्या आत्महत्येस ही लोक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
वाशीनाका येथील सावकार उदय शेट्टी याच्याकडून शारदा यांनी मुलीच्या लग्नासाठी 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु कर्जाची परतफेड करुनही सावकार आणि मिना पगारे यांच्याकडून वारंवार धमक्या येत असल्याचे शारदा यांनी सांगितले. तसेच खोटे गुन्हे दाखल करुन माझी फसवणुक होत असल्याचा आरोप शारदा यांनी केला आहे. शारदा ह्यांना मरिना लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.